शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:32+5:302021-04-20T04:42:32+5:30
जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपीट झाली. २० मार्च रोजी ६,६९७ शेतकऱ्यांच्या ४,८८० ...
जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपीट झाली. २० मार्च रोजी ६,६९७ शेतकऱ्यांच्या ४,८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट सुरूच असून, नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानीचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३९ गावांमध्ये १,६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २,१२३ शेतकरी बाधित झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ४० गावांमध्ये १,१७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १,८६१ शेतकरी बाधित झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २० गावांमध्ये १,६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, २,१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत, तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी १० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.