विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा मोर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 06:26 PM2019-08-09T18:26:02+5:302019-08-09T18:26:09+5:30
शेतकरी संघर्ष संघटना व युवकांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महापोर्टल बंद करावे, सर्व स्पर्धा परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटना व युवकांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक श्री शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूजन व हारार्पण करून या मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली. पाटणी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी या मोर्चाला संबोधित केले. महापोर्टल बंद करण्यात यावे, सर्व परीक्षा आॅफलाईन घेण्यात याव्या, प्रत्येक परीक्षेची प्रक्रिया जलद घेण्यात यावी, दरवर्षी रिक्त पदे भरण्यात यावी, जिल्हा शासकीय नोकरी भरती जिल्ह्याच्याच ठिकाणी व्हावी, पोलीस भरती प्रक्रिया ही अगोदर शारीरिक चाचणी व नंतरच लेखी चाचणी घेण्यात यावी, एक परीक्षा व एक पेपर एकाच दिवशी घेण्यात यावा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र वाशिम येथे स्थापन करून मागील २२ वर्षाच्या प्रलंबित मागणीला न्याय द्यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघर्ष संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांची उपस्थिती होती. या भव्य मोर्चाने वाशिमकरांचे लक्ष वेधून घेतले.