मंगरुळपीर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी, मालमोजणीसाठी अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 03:16 PM2017-11-22T15:16:31+5:302017-11-22T15:25:06+5:30
मंगरुळपीर येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर- येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, अपुरी जागा आणि नियोजनाअभावी मोजणी संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामनाही या ठिकाणी करावा लागत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा शेतमालास हमीभावापेक्षा खूप कमी भाव बाजारात मिळत असल्याने शासनाने नाफेडची खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर जिल्ह्यात सर्वप्रथम मंगरुळपीर येथे नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीचे पाच सहा दिवस शेतकऱ्यांना या संदर्भात फारशी माहिती नसल्याने आवक कमी होती; परंतु गत तीन दिवसांपासून या ठिकाणी आवक वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीनच दिवसांत या ठिकाणी दीड हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्यामधील ७०० क्विंटलहून अधिक सोयाबीनची मोजणी करण्यात आली आहे. त्यामुळे मंगरुळपीर येथील नाफेडच्या खरेदीला शेतकºयांचा प्रतिसाद लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, साठवणुकीची अडचण असल्याने येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात आवक झाल्यास येथील खरेदी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून यासाठी तातडीने नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.