अंतिम यादीअभावी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्याना नवीन पीककर्जाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:20 PM2018-04-30T14:20:48+5:302018-04-30T14:20:48+5:30
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्याना कर्जमाफी मिळाला आहे. मात्र, अंतिम यादी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे.
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्याना कर्जमाफी मिळाला आहे. मात्र, अंतिम यादी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे.
जून २०१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची मर्यादा घालून कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६० हजार शेतकऱ्यानी आॅनलाईन नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती वाशिम जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली. आता १ मे पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने कर्जमाफीचा लाभ नेमका किती शेतकऱ्याना मिळाला, नवीन पीककर्ज वाटप प्रक्रिया आदी बाबी गुलदस्त्यात आहेत. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर संंबंधित बँकांकडून सद्या शेतकऱ्याना खरीप हंगामाकरिता कर्ज वाटप केले जात आहे. त्यानुषंगाने यंदा १,४७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेला शेतकऱ्याना नव्याने पीककर्ज मिळणे अपेक्षीत आहे. मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्याना, सन २०१८-१९ या वर्षातील खरिप पीककर्ज वाटप करण्याला सुरूवात केली नाही. अंतिम यादी अप्राप्त असल्याने तसेच वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण सांगितले जात आहे. नव्याने पीककर्ज मिळणार की नाही, याबाबत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यामध्ये संभ्रम आहे.