शेतकऱ्यांनो, सोयाबीनला युरिया खताची मात्रा देऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:20+5:302021-07-14T04:46:20+5:30
जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पीक असून, या ...
जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पीक असून, या पिकाच्या मुळावर गाठी असतात. या गाठीद्वारे हवेत उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र शोषले जाते. त्यामुळे सोयाबीन पिकाला युरिया खताची मात्रा देण्याची आवश्यकताच नसते. तथापि, अनेक शेतकरी पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी सोयाबीन पिकाला युरिया हे रासायनिक खत देतात. यामुळे कर्बनत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. परिणामी फूलधारणा व फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला युरिया खताची मात्रा देण्याचा अट्टाहास करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
मागणी वाढल्यामुळे युरियाचा कृत्रिम तुटवडा
या आठवड्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला आधार झाला आहे. आता शेतकरी या पिकाला युरिया खताची मात्रा देण्यावर भर देत आहेत. प्रत्यक्षात हे चुकीचे आहे; परंतु शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी वाढल्याने आता जिल्ह्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचे यासंदर्भात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
-----------
कोट : प्रत्येक द्विदलवर्गीय पिकाच्या मुळावर गाठी असतात. या गाठी हवेतील नत्र शोषून घेण्याचे कार्य करतात. त्यामुळे या पिकांना युरियाच्या माध्यमातून अतिरिक्त नत्र देणे चुकीचे आहे. या प्रकारातून पिकाचे उत्पादन घटण्याची पर्यायाने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला युरिया खत देण्याचे टाळावे.
- शंकरराव तोटावार,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी