पीक फवारणीत शेतकरी व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:13+5:302021-07-15T04:28:13+5:30
मंगरुळपीर : सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग सध्या सोयाबीन पिकात तणनाशकासोबत ...
मंगरुळपीर : सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग सध्या सोयाबीन पिकात तणनाशकासोबत कीटकनाशकांची फवारणी करताना व्यस्त झालेले दिसत आहेत.
मागील महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बासंबा व परिसरातील बळिराजाने तूर, उडीद, मूग, कापूस, आदी पिकांबरोबर सोयाबीनची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यानंतर अनेक दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीने सोयाबीन पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने व पिकांमध्ये कोळपणी करूनही तणांची वाढ होत असल्याने अनेक शेतकरीवर्ग सध्या सोयाबीन पिकात तणनाशकाबरोबर कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहेत. दिवसेंदिवस वाढलेल्या डिझेलच्या व पेट्रोलच्या किमतीमुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे महागडे पडत आहे. यावर्षी इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांनी आपल्या शेतातील अवजाराचे भाव वाढविले असले तरी मजूर टंचाई व दिवसेंदिवस मजुरांच्या वाढत्या भावामुळे शेतकरीवर्ग यांत्रिक शेतीकडे वळला असेल. उत्पादनाच्या मानाने दिवसेंदिवस खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पादनाच्या मानाने बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येताना दिसून येत आहे. तसेच इंधन दरवाढीचा फटका सर्वांत जास्त शेतकरीवर्गाला बसला असून, इंधन दरवाढीमुळे खते व बी-बियाणे, तसेच कीटकनाशकांच्या किमतीतसुद्धा विक्रमी वाढ झाली असून, बाजारात सध्या सोयाबीन पिकाव्यतिरिक्त इतर पिकांना अजूनही पुरेसा भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यातच असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी शेतकरीवर्ग मात्र खरिपातील शेतीच्या कामात सध्या व्यस्त झाले आहेत.
---------
इंधन व मजुरीत वाढीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ
पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी फवारणी करण्याच्या कामात व्यस्त दिसून येत असला तरी इंधन दरवाढ व फवारणी करणाऱ्या मजुरांनीसुद्धा मजुरीत वाढ केल्याने शेतकऱ्यांच्याही खर्चात वाढ झाली आहे. यामुळे काही शेतकरी स्वत:च फवारणी करताना तालुक्यामध्ये माेठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.