शेतकरी गुंतले मशागतीच्या कामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:41 AM2021-03-10T04:41:11+5:302021-03-10T04:41:11+5:30
इंझोरी शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी बऱ्यापैकी होते. शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत असतानाच गतवर्षीच्या दमदार पावसामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळी ...
इंझोरी शिवारात मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी बऱ्यापैकी होते. शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत असतानाच गतवर्षीच्या दमदार पावसामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळी अद्यापही चांगली टिकून आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कपाशीला पाणी देणे शक्य होणार असून, उन्हाचा पारा वाढत असल्याने जमिनीची चांगली धूप व्हावी, पेरणीसाठी हाताशी पुरेसा वेळ असावा म्हणून शेतक-यांनी काडीकचरा वेचण्यासह नांगरणीला सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कपाशीसह सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला; परंतु शेतीशिवाय इतर व्यवसाय हाताशी नसल्याने गतवर्षीचे नुकसान विसरून शेतकरी नव्याने जोमाने शेती मशागतीच्या कामांत गुंतल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
-----------------
म्हसणीत अनियमित पाणी पुरवठा
इंझोरी: येथून नजीकच असलेल्या म्हसणी येथे गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांना उन्हातान्हात शेतशिवारातून पाणी आणावे लागत आहे.
-------------------
जामदरा तलावाची पाहणी
इंझोरी: येथून जवळच असलेल्या जामदरा घोटी येथील सिंचन तलाव लिकेज असल्याने हिवाळ्यातच कोरडा पडत आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर जि.प. जलसंधारण विभागाने शुक्रवारी तलावाची पाहणी केली.