वन्यप्राण्यांमुळे शेतकरी धास्तावले; वनविभागही हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:03 PM2019-05-07T18:03:21+5:302019-05-07T18:03:49+5:30
वाशिम : अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनी शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले चढविण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनी शेतकरी, शेतमजूरांवर हल्ले चढविण्याच्या घटनेत वाढ होत आहे. विशेषत: हा प्रकार मानोरा, कारंजा तालुक्यात सर्वाधिक असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभागही हतबल ठरत आहे.
सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला अत्यल्प बाजारभाव, बियाणे, खते व किटकनाशकांच्या वाढत्या किंमती आदी कारणांमुळे अगोदरच हैराण असलेल्या शेतकºयांसमोर अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांनीदेखील अडचणी निर्माण केल्या आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. त्यातुलनेत वनविभागाकडून समाधानकारक नुकसानभरपाई मिळत नाही. नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, प्रशासकीय कार्यवाहीदेखील किचकट असल्याने अनेक शेतकरी प्रस्तावच सादर करीत नाहीत. वन्यप्राण्यांपासून पिकांची होणारी नासाडी थांबविण्यासाठी शेतकरी आटापिटा करतात. मात्र, अलिकडच्या काळात वन्यप्राण्यांकडून हल्ले होत असल्यामुळे शेतकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा झाला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तर शेतकरी नेते तथा जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर यांनी जंगलालगतच्या शेतीला तार कुंपन करण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच वन्यप्राण्यांचा बंदोस्त करावा, अशी मागणी लावून धरली. मात्र, अद्याप या मागणीची दखल कुणीही घेतली नाही. गत महिनाभरात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात मानोरा तालुक्यातील वरोली येथील एका शेतकºयाचा मृत्यू तर सहा ते सात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथेही रानडुकराने हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला.
महिनाभरातील अशा आहेत घटना
७ एप्रिलच्या सायंकाळदरम्यान रानडुकराने हल्ला चढविल्याने यामध्ये वरोली येथील शेतकरी सुरेश राजाराम डोईफोडे यांचा मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास रुई गोस्ता येथील अजाबराव संभाजी मानतुटे यांच्यावरही रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. ३० एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील चोंढी शेतशिवारात मजुरीचे काम करीत असताना कमला डोमाजी घोडे (४५) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. मानोरा तालुक्यातील रोहणा येथील शेतमजूर यशवंत बारकू बोरचाटे यांच्यावर १ मे रोजी रानडुकराने हल्ला चढवून जखमी केले होते.