नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड
By Admin | Published: May 16, 2017 01:38 AM2017-05-16T01:38:18+5:302017-05-16T01:38:18+5:30
वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या ३१ मेपर्यंत शासकीय तूर खरेदी होणार असल्याने हमीभावात तूरीची विक्री व्हावी म्हणून जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
सन २०१३ ते २०१५ या दरम्यान निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. खरिप हंगामात पावसाच्या अनियमित हजेरीने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर पावसाने दगा दिल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती. सलग तीन वर्षे वाशिम जिल्हा दुष्काळाच्या छायेत होता. शासनाने दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषितही केले होते. सन २०१६ या वर्षात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले. मात्र, या वर्षातच शेतमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. शासनाने तूरीला ५०५० रुपये हमीभाव जाहिर केलेला आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाफेड केंद्रांवर मोठ्या संख्येने वळत आहेत. मध्यंतरी शासनाने नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ३१ मे पर्यंत शासकीय तूर खरेदी होणार आहे. प्रथम नाफेड केंद्रांवर नोंदणी करून ‘टोकन’ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. ग्रेडर व गोदामाचे नियोजन नसल्याने १२ मे पर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात होऊ शकली नव्हती. १३ मे पासून जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, कारंजा व मंगरूळपीर येथे शासकीय खरेदी सुरू आहे. मानोरा येथे नाफेड केंद्र नाही तर रिसोड बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरू होऊ शकली नाही. टोकन घेण्यासाठी मालेगाव, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ट्रक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. टोकन घेताना वाहन क्रमांक नोंदविणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अगोदरच ‘वाहन’ बुक करण्याची वेळ आली आहे.