वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 03:32 PM2019-12-15T15:32:33+5:302019-12-15T15:33:07+5:30
शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.
- माणिक डेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील अनेक गावांमधील शेती ही वनक्षेत्राला लागून आहे. यामुळे शेतांमधील पिकांना वन्यप्राण्यांचा धोका कायमचाच लागून असतो. वनविभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांनाच पिकांच्या रक्षणासाठी शेतांमध्ये बाराही महिने ‘जागल’साठी जावे लागते. त्याकरिता शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.
मानोरा तालुक्यातील विठोली, बेलोरा, हातना, भुली, पोहरादेवी, आमदरी, सावरगांव, मेंद्रा, वटफळ यासह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती वनक्षेत्रालगत वसलेली आहे. त्यावर खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध स्वरूपातील पिकांची पेरणी करण्यात येते; परंतु लागवडीपासूनच रानडुक्कर, रोही, हरीण, वानर आदी वन्यप्राण्यांचा त्रास सुरू होत असल्याने पिके संकटात सापडतात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाचे कुठलेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतांमध्ये उभारलेल्या झोपड्यांमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंमध्ये रात्रीलाही झोपायला जावून तथा जीव धोक्यात घालून दोन्ही हंगामातील पिकांचे रक्षण स्वत:च करावे लागत असून त्यास वनविभागाचा अकार्यक्षमपणा आणि बेजबाबदार वृत्ती कारणीभूत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक संकटांमुळे पोहरादेवी परिसरातील शेतकरी आधीच जेरीस आलेला आहे. त्यातच वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे वन्यप्राण्यांपासूनही शेतीपिकांचे नित्यनेम नुकसान होत आहे. असे असताना गत दोन वर्षात वनविभागाकडून या भागात गस्त सुरू असल्याचे कधी दिसून आले नाही, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज राठोड यांनी दिली.