रब्बी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 02:49 PM2019-12-10T14:49:57+5:302019-12-10T14:50:12+5:30
आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रब्बी हंगामात पीककर्ज मिळण्यासाठी शेतकरी संबंधित बँकांचे उंबरठे झिजवित आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत केवळ १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
कृषीप्रधान देशातील शेतकºयांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सन २०१९ या वर्षात खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यानंतरही अनियमित पाऊस राहिल्याने सोयाबीन, मूग, उडदाच्या उत्पादनात घट आली. अवकाळी पावसाने तर पिकांचे प्रचंड नुकसान केले. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अल्प बाजारभावाची भर पडली. चोहोबाजूंनी आलेल्या या संकटातून सावरत अनेक शेतकºयांनी रब्बी हंगामात पीककर्जाच्या माध्यमातून पेरणी करण्याचा प्रयत्न केला. काही शेतकºयांना पीककर्ज मिळाले तर काही शेतकºयांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले. २०१९-२० च्या रब्बी हंगामात पीककर्जासाठी ४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. रब्बी हंगाम संपत आला असताना ९ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १९२४ शेतकºयांना २२.१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्जासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. शेतकºयांना विनाविलंब पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी यापूर्वीच दिले आहेत. तथापि, काही बँकांकडून दिरंगाई होत असल्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.
४० कोटींच्या पीककर्जाचे उद्दिष्ट
सन २०१९ च्या रब्बी हंगामात ४० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्’ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिल्या आहेत. तथापि, ९ डिसेंबरपर्यंत २२.१५ कोटींचे पीककर्ज वाटप होऊ शकले.
यावर्षी शेतकºयांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागले. खरीप हंगामातही अनेक शेतकºयांना पीककर्ज मिळण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागले. आता रब्बी हंगामातील शेतकºयांना मागणीनुसार पीककर्ज मिळण्यास विलंब होतो. शेतकºयांची गैरसोय होता कामा नये, असे प्रशासनाचे आदेश असतानाही शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळत नाही.
- आकातराव सरनाईक
देऊळगाव बंडा ता. रिसोड