अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकरी धडकले मंगरूळपिर तहसील कार्यालयावर!
By संतोष वानखडे | Published: July 17, 2023 07:35 PM2023-07-17T19:35:28+5:302023-07-17T19:36:08+5:30
अतिवृष्टीची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली.
संतोष वानखडे, वाशिम: आवश्यक ती सर्व कागदपत्रे देउनही अद्याप अतिवृष्टीची नुकसानभरपाइ मिळाली नसल्याने मंगरूळपीर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी १७ जुलै रोजी मंगरूळपीर तहसिल कार्यालयावर धडकले. अतिवृष्टीची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली.
निवेदनानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये कवठळ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांना अनुदान मिळणे अपेक्षीत होते. त्यानुसार गावात याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. पात्र शेतक-यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवकांमार्फत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. तरीसुध्दा अद्याप नुकसानभरपाइ मिळाली नाही. त्यामूळे शेतकऱ्यांनी सोमवारी तहसिल कार्यालय गाठून याप्रकरणी चौकशी करावी आणि तातडीने नुकसानभरपाइची रक्कम खात्यात जमा करावी अन्यथा २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी कवठळ परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.