शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:11 PM2019-08-28T22:11:27+5:302019-08-28T22:11:42+5:30
आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे
वाशिम - शासनाकडून कर्जमुक्तीची केवळ घोषणाच झाली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शिवसेनेला हे राज्य सुजलाम्, सुफलाम् करायचे आहे, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवार, २८ आॅगस्ट रोजी कारंजा येथे जन आशिर्वाद यात्रेला संबोधित करताना केले.
बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कारंजा येथे जन आशीर्वाद यात्रा घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील युवक-युवतींशी संवाद साधला. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, की ही यात्रा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन नव्हे; तर तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी काढण्यात आली आहे. राज्यातील शेतक-यांना अद्यापपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही. पिकविम्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर मात करण्यासाठी जनतेची मदत हवी आहे. शेतकºयांनी आत्महत्या न करता शिवसेनेसारखा कणखर विचार करावा, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे कारंजात दाखल झाल्यानंतर आमदार गोपीकिशन बाजोरिया, पालकमंत्री संजय राठोड आणि माजी आमदार प्रकाश डहाके यांनी गुरुमाऊलीची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील शिवेसना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
सायंकाळी ४ वाजताची सभा सुरू झाली रात्री ८ वाजता
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआर्शीवाद यात्रेची कारंजा येथील सभा ही सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या सभेला रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरूवात झाली. यामुळे उपस्थित शिवसैनिक आणि युवा कार्यकर्त्यांसह लोकांना तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले.