नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्याची दोन वर्षांपासून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:12+5:302021-06-09T04:51:12+5:30
राजुरा येथील शेतकरी नारायण सखाराम भगत यांच्या गट क्रमांक २०६ मधील एकूण ३.१३ हे. आर शेतजमिनीपैकी १.४२ हे. ...
राजुरा येथील शेतकरी नारायण सखाराम भगत यांच्या गट क्रमांक २०६ मधील एकूण ३.१३ हे. आर शेतजमिनीपैकी १.४२ हे. आर. क्षेत्र पाटबंधारे विभाग, वाशिम यांनी सुदी संग्राहक तलावाच्या निर्मितीसाठी गत काही वर्षांपूर्वी संपादित केले होते, तर उर्वरित शेतजमिनीवर ते खरिपासह रब्बीचे पीक चांगल्याप्रकारे घेत होते. मात्र गत दोन वर्षांपासून परिसरात सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने सुदी संग्राहक तलावाच्या क्षेत्रात खोदकाम करून रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज नेण्यात आले. परिणामी भगत यांच्या कसदार व वहिती शेताच्या बांधावर मोठ मोठे खड्डे पडल्याने तलावाचे पाणी शेतात घुसून वहिती शेताची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. त्यामुळे भगत यांचे गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना खरिपाची पेरणी करणे मुश्किल झाले आहे. नोव्हेंबर २०१९ पासून ते आजवर शेताची दुरुस्ती करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी भगत यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतासह संबंधित अधिकाऱ्यांचे सतत दोन वर्षांपासून उंबरठे झिजवले. भगत यांच्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र समृद्धी महामार्ग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खरीप हंगामात पेरणी करण्यायोग्य शेतजमीनच राहिली नसल्याने चरितार्थ चालवायचा तरी कसा, असा यक्ष प्रश्न भगत कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
.................
नुकसान पाहणी व आश्वासन हवेतच विरले
पाटबंधारे विभाग व समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन बऱ्याचवेळा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व हे काम तात्काळ पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले; मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी, संबंधितांनी दिलेले आश्र्वासन अद्यापही पूर्ण झाले नाही. उलट भगत यांनी स्वत: महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी व समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांकडे पाठपुरावा करून आपली समस्या सोडविण्याबाबतचा सल्ला मालेगाव पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्याकडून दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
............
भगत यांच्या शेताच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. समृद्धी महामार्गाच्या संबंधितांना उपाययोजना करण्याबाबत पत्रसुद्धा दिले. शेतक-यांनी समृद्धीच्या ठेकेदाराकडे पाठपुरावा करावा.
- आर. व्ही. नरड
उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, मालेगाव