कृषी केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक!
By admin | Published: May 12, 2017 08:53 AM2017-05-12T08:53:10+5:302017-05-12T08:53:10+5:30
कृषी विभाग सज्ज; अनुदानित खत वितरणासाठी ३८४ ‘पॉस’ मशीन.
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. येत्या १ जूनपासून खते आणि बी-बियाण्यांच्या विक्रीदरम्यान कृृषी सेवा केंद्रांवर होणारे संभाव्य गैरप्रकार
रोखण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे, तसेच शासनाच्या निर्देशानुसार बायोमेट्रिक पद्धतीने अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी जिल्ह्यात ३८४ पॉस मशीन प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने पेरणी प्रस्तावित केली आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली असून, कृषी सेवा केंद्रातून या वस्तूंचे वितरण होताना गैरप्रकार होऊ नयेत. म्हणून नियमाप्रमाणे सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध खतांचे वितरण व्यवस्थितरीत्या करण्यासाठी तसेच काळाबाजार करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा स्तरावर एक व तालुका स्तरावर प्रत्येकी एक असे एकूण सात पथक गठित करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी विकास अधिकारी तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी या पथकांचे नेतृत्व करणार आहेत. तालुका स्तरावरील भरारी पथकात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह वजनमापे निरीक्षक आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खतांचे पारदर्शकपणे वितरण करणे, शासकीय किमतीत खताची विक्री होते की नाही, अवैध साठा हुडकून काढणे, तक्रारींचे निवारण करणे आदी कर्तव्य या पथकाला पार पाडावी लागणार आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमक्या खरेदी केलेल्या खतांचे अनुदानच देता यावे म्हणून शासनाने डीबीटी पद्धतीचा अर्थात थेट शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होण्यासाठी ह्यपॉसह्ण मशीनचा वापर करण्याचे शासनाने ठरविले आहे. या पद्धतीत शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी झाल्यानंतरच मशीनमधील माहितीच्या आधारे खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनुदानित खतांच्या कृत्रिम टंचाईवर नियंत्रण येऊन शेतकऱ्यांना फायदा होईलच, शिवाय शासनाचे मोठ्या प्रमाणात अनुदानही वाचणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३८४ पॉस मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील १८ खत उत्पादक कंपन्यांसाठी या मशीनचे मॉनिटरिंंग ह्यराष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सह्णकडून केले जाणार आहे. या मशीनच्या वापरासाठी अधिकृत आणि नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांना मागील आठवड्यात पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मशीनच्या वितरणानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कृषी केंद्रांवरील संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. जिल्ह्यात येत्या १ जून पासून बायोमेट्रिक पद्धतीने अर्थात पॉस मशीनने अनुदानित खतांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत ३८४ मशीन उपलब्ध झाल्या आहेत.
- नरेंद्र बारापत्रे
कृषी विकास अधिकारी,