शेतकऱ्यांची विहिर दुरुस्ती वांध्यात
By admin | Published: April 2, 2017 04:33 PM2017-04-02T16:33:39+5:302017-04-02T16:33:39+5:30
विहिरींच्या दुुरुस्तीसाठी आदेश मिळाले आहेत; परंतु ई-मस्टर काढण्यासाठी सांकेतांक क्रमांक मिळाला नाही. त्यामुळे मानोरा तालुक्यातील २५० विहिरींची दुरुस्ती अडचणीत आली आहे.
वाशिम: अतिवृष्टीमुळे सन २०१३-१४ मध्ये खचलेल्या विहिरींच्या दुुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश मिळाले आहेत; परंतु ही कामे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-मस्टर काढण्यासाठी सांकेतांक क्रमांक मिळाला नाही. त्यामुळे मानोरा तालुक्यातील २५० विहिरींची दुरुस्ती अडचणीत आली आहे.
मानोरा तालुक्यात सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या होत्या. या विहिरींची पाहणी करण्यात आली आणि तहसील कार्यालयाकडून ४३१ शेतकऱ्यांची यादी मानोरा पंचायत समितीकडे पाठविण्यात आली. त्या शेतकऱ्यांंकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करून घेण्यात आली आणि जवळपास २५० विहिरींच्या दुरुस्तीला कार्यारंभ आदेशही प्राप्त झाले; परंतु ई-मस्टर काढण्यासाठी कामाचा सांकेतांक क्रमांक प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी १७ जानेवारी २०१७ ला उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे या विहिर दुरुस्तीच्या प्रस्तावाला नवीन सांकेतांक क्रमांक मिळण्यासाठी पत्र पाठविले; परंतु अद्यापही या प्रस्तावाला नवीन सांकेतांक क्रमांक प्राप्त झाला नाही. त्यामुळे अडिचशे शेतकऱ्यांच्या विहिर दुरुस्तीचे काम खोळंबले आहे.