विद्युत रोहित्रासाठी शेतकऱ्यांची धडपड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 04:13 PM2019-12-06T16:13:48+5:302019-12-06T16:13:55+5:30
नवीन विद्युत रोहित्र मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.
वाशिम : विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड होत असल्याने सिंचन करण्यात व्यत्यय निर्माण होत आहे. नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलवून मिळावे तसेच अतिरिक्त विद्युत रोहित्र पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र, विद्युत रोहित्राचा तुटवडा असल्याने ही मागणी पूर्ण होत नसल्याने सिंचन प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनाची सुविधा असणाºया बहुतांश शेतकºयांनी गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली आहे तर काही शेतकरी पेरणी करीत आहेत. या पिकांना सिंचन करण्यासाठी सलग तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कमी-अधिक विद्युत दाब होत असल्याने मोटारपंप जळण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. याबरोबरच विद्युत रोहित्र नादुरूस्त असणे, नवीन विद्युत न मिळणे आदी समस्यांनी शेतकºयांना त्रस्त करून सोडले आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने आणि नवीन विद्युत रोहित्र मिळण्यास प्रचंड दिरंगाई होत असल्याने सिंचन प्रभावित होत आहे. पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा या जिल्ह्यातही नादुरूस्त विद्युत रोहित्र आणि नवीन विद्युत रोहित्राचा तुटवडा यामुळे शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नादुरूस्त विद्युत रोहित्राची दुरूस्ती करण्यासाठी तसेच नवीन विद्युत रोहित्र मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. महावितरण कंपनीकडून ‘अजून थोडा धीर धरा’, असे उत्तर मिळत असल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.