‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची तोबा गर्दी!
By admin | Published: April 7, 2017 01:34 AM2017-04-07T01:34:51+5:302017-04-07T01:34:51+5:30
तीन ठिकाणी बारदाना उपलब्ध : उर्वरित तीन केंद्र अद्याप बंदच!
वाशिम : बारदान्याअभावी गत पंधरवड्यापासून बंद असलेली नाफेडची तूर खरेदी बुधवारपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू झाली आहे. वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी खरेदी सुरू असून, उर्वरित तीन ठिकाणी अद्याप बारदाना उपलब्ध झाला नाही. दरम्यान, गुरुवारी शेतकऱ्यांनी तीनही नाफेड केंद्रांवर तोबा गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकरी घेत आहेत. नवीन तूर बाजारात येण्यापूर्वी प्रतिक्विंटल आठ हजारांच्यावर बाजारभाव होते. नवीन तूर बाजारात येताच भाव गडगडले आणि चार ते साडेचार हजारांदरम्यान स्थिरावले. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने तुरीला प्रतिक्विंटल ५०५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, बाजार समित्यांमध्ये शेतमालाची प्रतवारी पाहून ४५०० रुपयांच्या आतच दर मिळत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे वळले. प्रमाणापेक्षा जास्त आवक झाल्याने साठवणुकीचा प्रश्न समोर करून नाफेड केंद्र काही कालावधीसाठी बंद करण्यात आली. मालेगाव, कारंजा, वाशिम आणि अनसिंग येथे महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने, तर मंगरुळपीर येथे विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि रिसोड येथे फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने स्वतंत्र तूर खरेदी केली होती. १८ मार्चपासून या केंद्रांवर नाफेडची तूर खरेदी बंद होती. त्यामुळे हजारो क्विंटल शेतमाल नाफेडच्या केंद्रांवर मोजणीविना तसाच पडून होता.
आता मंगरूळपीर, वाशिम व कारंजा येथील केंद्रांवर बारदाना उपलब्ध झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. बुधवारपासून मंगरूळपीर येथील बाजार समितीसमोर शेतमालाच्या वाहनांची रांग लागली आहे. वाशिम येथेही शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली. कारंजा येथे गुरुवारी बारदाना उपलब्ध झाला असून, सुरुवातीला ओट्यावरील शेतमालाची मोजणी केली जाईल, त्यानंतरच अन्य तुरीची खरेदी केली जाणार आहे. उर्वरित रिसोड, मालेगाव, अनसिंग येथे अद्याप खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाही.
उन्हाचा त्रास सहन करत तूर मोजणीची प्रतीक्षा!
मंगरुळपीर : येथील नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, उन्हाचा त्रास सहन करत आपला नंबर लागण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागत आहे. घरी ये-जा करण्यासाठी प्रवासभाड्याचा खर्च परवडणार नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मंगरूळपीरमध्ये मुक्काम ठोकला असून, त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत ३३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, मोजणीचे काम सुरळीत सुरू असल्याची माहिती खरेदी विक्री व्यवस्थापक के. एन. सुर्वे यांनी दिली. दरम्यान, शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी विनोद लुंगे यांनी फिल्टर तथा थंडगार पाण्याची मोफत व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे.