कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत शेतकरी चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:08+5:302021-07-02T04:28:08+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ कृषी विस्तार एस. के. देशमुख व विषय विशेषज्ञ पीकशास्त्र टी. एस. देशमुख मंचावर उपस्थित होते. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी तरुण शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धती पशू व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती कशाप्रकारे साधता येईल, या विषयी समजावून सांगितले. प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी कृषी दिनाचे महत्त्व व त्याअनुषंगाने आयोजित ‘एकात्मिक शेती पद्धती व पशूव्यवसायातून स्वयंरोजगार निर्मिती’ कार्यशाळेची गरजबाबत उकल करून कृषी विज्ञान केंद्रातील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. टी. एस. देशमुख यांनी मार्गदर्शनात शेतीसाठी कृषी हवामान सल्ला वापराचे तंत्रज्ञान व सद्यस्थितीतील खरीप पीक व्यवस्थापन विषयावर माहिती दिली. कार्यक्रमात सहभागी युवकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषी डायरी व शेवगा पिकाची रोपे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमास वाशिम जिल्ह्यातील अडोळी, इलखी, खडकी सदार, मांगवाडी, टो, बोराळा गावातील युवक शेतकरी बांधवांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. देशमुख तर आभार जी. एस. काळे यांनी मानले.
--------------------------------
बॉक्स: मान्यवरांकडून प्रशिक्षणार्थींचे शंका निरसन
करडा येथे आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षणार्थिंनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन शास्त्रज्ञांनी करून शिफारशीत तंत्रज्ञान अंगीकारावे, असे एकमताने सांगितले. त्यानंतर प्रक्षेत्र भेटीमध्ये युवकांनी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉड्यूल सेंद्रिय तसेच जैविक निविष्ठा उत्पादन युनिटचीसुद्धा पाहणी करून खातरजमा केली.