शेतकऱ्यांनी कृषीपंप वीजबिल सवलतीचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:37 AM2021-03-14T04:37:01+5:302021-03-14T04:37:01+5:30
महावितरणच्या वीजबिल सवलत योजनेच्या जनजागृतीसाठी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन ...
महावितरणच्या वीजबिल सवलत योजनेच्या जनजागृतीसाठी १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथे शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कनिष्ठ अभियंता रविंद्र गिरी, जीवन इंगळे, लाईनमन वानखडे यांच्यासह महावितरण कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीतून मुक्त होण्यासाठी महावितरणने कृषी वीजबिल सवलत योजना २०२० जाहीर केली असून, या योजनेंतर्गत वसुल रकमेच्या ३३ टक्के रकमेचा त्याच ग्राहकांच्या पायाभूत सुविधांसाठी वापर करण्यात येणार आहे. माहे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या वीज थकबाकीवरील व्याज व विलंब आकार या योजनेंतर्गत पूर्णपणे माफ करण्यात येणार असून केवळ मूळ थकबाकीच्या वसुलीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या धोरणानुसार कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय या योजने अंतर्गत कृषीपंप वीजबिलाच्या माध्यमातून भरणा झालेली रक्कम त्याच गावातील वीज समस्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी या वीजबिल सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे सहायक अभियंता विनय बोळे यांनी केले आहे.