पीकविम्याने घडविला सेतू सुविधा केंद्रावरच शेतक-यांना मुक्काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:42 PM2017-08-05T17:42:58+5:302017-08-05T17:43:23+5:30
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली.
वाशिम, दि. 5 - प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’च्या तांत्रिक अडचणींमुळे रात्री उशीरापर्यंत अर्ज स्विकारलेच गेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या सुमारास गावी परत जाण्याची सोय नसल्याने शेकडो शेतक-यांना सेतू सुविधा केंद्रावरच मुक्काम करावा लागल्याचा प्रकार कारंजात घडला.
जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता लागू करण्यात आलेल्या पिकविमा योजनेची अंतीम मुदत पुर्वी ३१ जुलै २०१७ होती. मात्र, शेतक-यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यास शासनाने ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. अशातच २ ऑगस्टला निर्णय फिरवत मुदत ४ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, अर्ज ऑफलाईन नव्हे; तर ऑनलाईन स्विकारण्याची अट टाकण्यात आली. पुन्हा तिस-यांदा ४ ऑगस्टला सायंकाळी निर्णय बदलण्यात येवून ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पीकविमा काढण्यास मंजूरी मिळाल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडे धडकले. एकूणच या सर्व गदारोळात प्रशासनासोबतच शेतक-यांचीही चांगलीच गोची झाली.
दरम्यान, महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र या दोन्हीही संस्थांमार्फत ‘ऑनलाईन’ अर्ज स्विकारत असताना ‘सर्व्हर डाऊन’ची तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे ४ ऑगस्टला दिवसभर ताटकळत बसलेल्या शेतक-यांचे अर्ज रात्री उशीरापर्यंतही स्विकारले गेले नाहीत. कारंजा येथील सेतू सुविधा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे शेतक-यांना काम न होताच त्याचठिकाणी मिळेल त्या जागेवर झोपून रात्र काढावी लागली. यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.