ढगाळ वातावरणामुळे तूर वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:34 AM2021-01-09T04:34:03+5:302021-01-09T04:34:03+5:30
गतवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद , मूग , सोयाबीन , कपासी आदी पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. या पिकांवर पेरणीसह केलेला ...
गतवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद , मूग , सोयाबीन , कपासी आदी पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. या पिकांवर पेरणीसह केलेला इतर खर्च सुद्धा वसूल झाला नाही. त्यानंतर तुरीचे पीक जोमात आल्याने या पिकातून मोठ्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली होती; परंतु ऐनवेळी तुरीच्या पिकावर वाळवी आल्याने तुरीची झाडे सुकू लागली. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनातही घट येऊ लागली. आता उरल्यासुरल्या तुरीच्या पिकाची कापणी करून ते पूर्णपणे सुकण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत असतानाच गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यात एकाचवेळी अनेकांनी तुरीची काढणी सुरू केल्याने अनेकांच्या गंज्या शेतातच पडून आहेत. शिवाय बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची कापणीही प्रलंबित आहे. अशात पाऊस आल्यास शेतात उभे असलेले आणि कापणी करून ठेवलेले तुरीचे पीक भिजून पुन्हा नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी कापणी केलेल्या तुरीच्या गंज्या झाकण्यासह शेतातील तुरीची कापणी करून गंजी लावण्यासाठी मजुरांचा शोध घेताना दिसत आहेत.
-----------------
मळणीयंत्राचा तुटवडा
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांनी तुरीच्या काढणीची घाई सुरू केली आहे. उंबर्डा बाजार परिसरातील बऱ्याच शेतात तुरीची काढणी होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे मळणीयंत्राचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक शेतकऱ्यांना आता आपली तूर वाचविण्यासाठी गंज्या व्यवस्थित झाकून ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.