महाबीज बियाणे वाटपातील सावळ्या गोंधळाने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:30 AM2021-05-29T04:30:02+5:302021-05-29T04:30:02+5:30
*बियाणे खरेदी विक्री संघात येऊनही वाटपात विलंब लावण्या मागील रहस्याने शेतकरी संतप्त* मानोरा- खरेदी-विक्री संघाने महाबिज सोयाबीन बियाणे वाटपात ...
*बियाणे खरेदी विक्री संघात येऊनही वाटपात विलंब लावण्या मागील रहस्याने शेतकरी संतप्त*
मानोरा- खरेदी-विक्री संघाने महाबिज सोयाबीन बियाणे वाटपात सावळा गोंधळ चालविला असून, तालुक्यातील शेतकरी २७ आणि २८ मे रोजी सकाळपासून दिवसभर उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनही खरेदी-विक्री संघटनेने बियाणे वाटपासाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे धोरण चालू केलेले असून, प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
मानोरा तालुका हा अविकसित श्रेणीत मोडणारा तालुका म्हणून राज्याच्या नकाशावर प्रसिद्ध असून, सिंचन, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. येथील बहुतांश शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खरीप हंगामाच्या भरवशावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. मागील ५ ते ६ वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे जिकिरीचे झाले आहे. कधीकाळी पांढरे सोने पिकविणारा शेतकरी आता सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे. आधी अस्मानी संकटाने येथील शेती पार मोडकळीस आली असताना, आता मात्र कोरोना महामारीच्या संकटात शेतकरी सुलतानांकडून नागविला जात असून, कडक निर्बंधामुळे बी-बियाणे व खताचे दरही गगनाला भिडले आहेत. सहकार क्षेत्राअंतर्गत चालविले जाणारे खरेदी-विक्री संघ मात्र यावेळी गाढ झोपेत असल्याचा आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. शेतकरी सोयाबीन बियाण्यांसाठी ताटकळत असताना मानोरा खरेदी-विक्री संघात येऊन पडलेल्या सोयाबीन बियाणे वाटपास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांत राेष व्यक्त केल्या जात आहे.
खरीप हंगाम तोंडावर असतानाही उपलब्ध सोयाबीन बियाणे वाटप करण्यातील विलंबाचे रहस्य काय? हा कळीचा व गंभीर मुद्दा असून, शासनाने याप्रकरणी दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ अनुदानित सोयाबीन बियाणे वाटप करून न्याय देण्यात यावा.
मनोहर राठोड, शेतकरी नेते, मानाेरा