‘फळ पीक विमा’कडे शेतक-यांची पाठ!
By admin | Published: June 19, 2017 04:20 AM2017-06-19T04:20:15+5:302017-06-19T04:20:15+5:30
जनजागृतीचा अभाव; केवळ ७३ संत्रा उत्पादकांनी उतरविला विमा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा आणि डाळिंब या फळ पिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जात आहे; मात्र प्रभावी जनजागृतीचा अभाव असल्याने संत्रा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जून असताना तोपर्यंंंत केवळ ७३ संत्रा उत्पादक शेतकर्यांनीच विमा उतरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संत्रा फळ पिकाकरिता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डी आसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहागीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस आणि मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलूबाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु., पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे आणि येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर ७0 हजार रुपये ठेवण्यात आली होती; तर एकूण विमा हप्ता १८ हजार ८४४ रुपये आहे. त्यापैकी शेतकर्यांना केवळ ३ हजार ५00 रुपये रक्कम भरावयाची होती; परंतु खरिपाच्या पेरणीत व्यस्त असलेल्या अनेक शेतकर्यांची तूर विकणे बाकी असून, ज्यांची तूर विकल्या गेली, त्यांना नाफेडकडून अद्याप चुकारे मिळाले नाहीत.
सोयाबीनलाही अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्यामुळे शेतकर्यांच्या हाती रोख पैसा शिल्लक नसल्याने ३ हजार ५00 रुपये विमा रक्कम भरणेदेखील कठीण जात असल्याने शेतकर्यांनी विमा योजनेकडे चक्क पाठ फिरवली आहे. १४ जून या अंतिम मुदतीपर्यंंंत ७३ शेतकरी संत्रा फळ पीक विमा योजनेत सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.