शेतक-यांनो, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा!
By admin | Published: July 2, 2017 08:56 AM2017-07-02T08:56:56+5:302017-07-02T08:56:56+5:30
शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले. स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ह्यआत्माह्णचे प्रकल्प संचालक डी.एल. जाधव, कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्रा. डॉ.बी.डी. गीते, करडा कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विश्वनाथ सानप म्हणाले, की कृषिदिन हा सर्वार्थाने शेतकऱ्यांचा दिवस आहे. कै. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती निर्माण केली. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत बदल करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, गीते, निवृत्ती पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी नामदेव नागरे, संजय कानड, शेखर सानप, विठ्ठल ब्रम्हेकर, ध्रुव राठोड, रामराव ठाकरे आदींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मंगरुळपीर पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी अधिकारी शेळके आणि जिल्हा परिषद ग्रामविकास अधिकारी सुनील इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले. संचालन कृषी अधिकारी शेळके यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.