वाशिम जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:12 PM2018-03-04T20:12:14+5:302018-03-04T20:12:14+5:30
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
गतवर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. पावसाने सरासरी गाठली नव्हती. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यानंतर बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतकºयांच्या नाकीनऊ आणले होते. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई देण्याचे नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहिर केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने बोंडअळीग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले. वाशिम जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवर कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अकधक नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभगााने शासनाकडे पाठविला आहे. शेतकºयांसह गावांतील पंचांना घेऊन तलाठी आणि कृषी सहाय्यक, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी कपाशीच्या शेतात भेटी देऊन पंचनामे केले होते. यामध्ये मानोरा तालुक्यात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाले. याप्रमाणेच मंगरुळपीर तालुक्यात १८७६ हेक्टरपैकी संपूर्ण क्षेत्र जिरायतीच असून, या सर्व क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. रिसोड तालुक्यात ५२३ हेक्टर जिरायती आणि वाशिम तालुक्यातील ६५२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती भागातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. मालेगाव तालुक्यात पेरणी केलेल्या १६५८.९ हेक्टर क्षेत्रापैकी जिरायती भागातील ९८.३३, तर बागायती क्षेत्रातील १५६०.६ हेक्टर क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फ टका बसला. कारंजा तालुक्यात जिरायती भागातील ७५२३.६१ हेक्टर कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. आज ना उद्या नुकसानभरपाई मिळेल, या आशेवर दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे. कापूस उत्पादक शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महादेव सोळंके यांनी केली.