वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शेतातच ‘जागल’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:39+5:302021-07-25T04:34:39+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे संरक्षण म्हणून अनेक शेतकऱ्यांवर शेतात जागल करण्याची वेळ आली ...
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे संरक्षण म्हणून अनेक शेतकऱ्यांवर शेतात जागल करण्याची वेळ आली आहे.
यंदा शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता गत दहा दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस असल्याने शेतात पाणी साचत आहे. त्यातच काही ठिकाणी वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडीदेखील होत आहे. मुंगळा परिसरात निलगाय, रोहि, रानडुकर, हरिण, वानर आदी वन्यप्राणी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. जंगलाशेजारी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता यामुळे अधिकच वाढत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण म्हणून मुृंगळा परिसरातील काही शेतकरी शेतातच ‘खोपडी’ तयार करून ’जागल’ करीत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे वारंवार केली. मात्र, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त अद्यापही झाला नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
००००
जंगली भागातील शेतीला तारेचे कुंपण असावे !
जिल्ह्यात जंगली भागालगत असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होत आहे. जंगलाला लागून असलेल्या कार्यक्षेत्राला तसेच शेतीला तारेचे कूंपन असावे, अशी मागणी मुंगळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
००००
नुकसान झाल्यास अल्प भरपाई !
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून अल्प भरपाई मिळते, असा दावा शेतकऱ्यांनी केला. नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव तयार करणे, वनविभागाकडे वारंवार चकरा मारणे यातच अर्धी शक्ती वाया जाते, असाही सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.