जलसंधारणासाठी शेतकऱ्यांना मिळणार मोफत जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:47 PM2019-12-24T13:47:40+5:302019-12-24T13:47:49+5:30
गरज असलेल्या गावांना मशीन देण्यासाठी बिजेएसने आता पुढाकार घेतला असुन शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी याचा उपयोग करुन घेतल्यास मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे पूर्ण करता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुजलाम सुफलाम वाशिम प्रकल्पंतर्गत भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) आता जिल्हयातील गावांना जेसीबी मशीन देण्याचे ठरविले आहे. ज्या ज्या गावांना नव्याने जलसंधारणाची कामे करावयाची आहेत, त्यांना ही मशीन मागणीनुसार देण्यात येणार आहे.
वाशिम जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने गतवर्षी जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्यावतीने जलसंधारणाची विविध कामे राबविण्यात आली. आता जिल्ह्यातील ग्रामपंचायती, प्रगतशिल शेतकरी, शेतकरी मंडळे, यांच्यामार्फत प्रस्तावित जलसंधारण कामे करण्यासाठी बिजेएसच्या मशीन मोफत उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातुन सर्व तालुक्यांमध्ये वैयक्तीक व सामुहिक शेततळे, सीसीटी, डीप सीसीटी आदि प्रकारचे जलसंधारणपर उपचार कामे करणे शक्य होणार आहे. याशिवाय गाव तलाव, वनतळे, पाझर तलाव, मोठी धरणे यांमधील गाळ काढणे, नाला खोलीकरण अशी विविध कामे करण्यासाठी देखील ग्रामपंचायती त्यांच्या निधीतून अथवा लोकवर्गणी गोळा करुन मशीन मागवु शकतात. जिल्हा प्रशासन व बिजेएस यांच्या माध्यमाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेली असली तरी सुध्दा अजुनही बरीच कामे वाशिम जिल्ह्यात होणे बाकी असल्याचे दिसत आहे. भारतीय जैन संघटनेने संपूर्ण जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला असुन गावांसोबतच आता थेट शेतकऱ्यांना देखील या मशीनचा वापर करुन शेताजवळ असलेले नाले साफसफाई करुन खोलीकरण आणि शेतात नवीन शेततळी तयार करण्यासाठी संधी उपलब्ध केली आहे. गरज असलेल्या गावांना मशीन देण्यासाठी बिजेएसने आता पुढाकार घेतला असुन शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी याचा उपयोग करुन घेतल्यास मोठ्या प्रमाणात जलसंधारण कामे पूर्ण करता येणार आहेत. या माध्यामतून जिल्हयाची पाणी साठवण क्षमता आणखी वाढण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती आणि शेतकºयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा व सहसमन्वयक निलेश सोमाणी यांनी केले आहे.
डिझेल, मानधनाचा खर्च इतरांना करावा लागणार
ज्या शेतकºयांना व ग्रामपंचायतींना जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशीन हवी असेल त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत तसेच बिजेएसकडे नावे द्यावीत, ग्रामपंचायतच्या माध्यमातुन भारतीय जैन संघटनेकडून मोफत मशीन पुरवण्यात येईल. याकरिता मशीनला लागणारे इंधन (डिझेल) व मशीन आॅपरेटरचे मानधन याचा खर्च संबंधीत शेतकरी अथवा ग्रामपंचायतींना करावा लागेल. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे बीजेएसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.