शेतक-यांनी वाघाच्या भीतीने झाडावर रात्र काढली जागून!
By admin | Published: August 6, 2015 12:46 AM2015-08-06T00:46:45+5:302015-08-06T00:46:45+5:30
कारपा येथील जंगलात शेतक-यांना वाघ दिसला.
कारपा (जि.वाशिम) : येथील जंगलात जागल करणार्या शेतकर्यांना वाघ दिसल्याने २ ऑगस्टच्या अख्यी रात्र २0 ते २५ शेतकर्यांनी झाडावर जागून काढल्याची बाब समोर आली आहे. २ ऑगस्ट रोजी रोजच्या प्रमाणे शेतकरी आपल्या शेतात रोही पिके खातात म्हणून जागलीसाठी गेले . त्या दिवशी रात्री ९ ते ९.३0 वेळेत मधू जाधव या शेतकर्याने वाघ दिसल्यानंतर आरोळ्या ठोकून इतर शेतकर्यांना सतर्क केले. दूर अंतरावरून बॅटरीचा उजेड पाडल्यानंतर वाघ असल्याचे दिसून आले. वाघाच्या भीतीने अनेक शेतकरी झाडावर चढून आरडाओरड करीत होते, तर बर्याचशा शेतकर्यांच्या खोपड्या झाडावर बांधलेल्या असल्याने ते अगोदरच झाडावर होते. काही शेतकर्यांच्या झोपड्या जमिनीलगत असल्याने ते शेतकरी मात्र त्या रात्री झाडावरच थांबले. २ , ३ व ४ ऑगस्ट रोजी रात्री वाघाच्या भीतीने रोही दूरवर निघून गेले, परंतु रोह्यांचा अंदाजे ५0 ते ६0 असा कळप फिरत असल्याचे शेतकरी विजय राठोड, बळीराम राठोड, विष्णु मनवर, दयाराम ढगे, शाहू राठोड, प्रेम राठोड, मनोज चव्हाण, लक्ष्मण प्रभू ,राजराम मानतुरे, मारोती व्यवहारे या शेतकर्यांनी सांगितले. अद्यापही शेतकरी वाघाच्या भीतीने वावरत असल्याचे दिसून येते.