अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!
By admin | Published: March 17, 2017 03:29 AM2017-03-17T03:29:27+5:302017-03-17T03:29:27+5:30
संत्रा, आंबा पिकांचे नुकसान ; सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात.
वाशिम, दि. १६- जिल्हय़ात सर्वदूर गुरुवार, १६ मार्च रोजी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलूबाजार परिसरातील काही गावांना गारपिटीने झोडपले. प्रशांत प्रल्हाद हिरपूरकर (रा. वनोजा, ता. मंगरूळपीर) यांच्यासह इतर शेतकर्यांच्या संत्र्याचे वादळी वार्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
कडक उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात, गारांसह झालेल्या या पावसामुळे प्रामुख्याने आंबा आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे.
मंगरुळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्र्याचे नुकसान
मंगरुळपीर तालुक्यात १६ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी, वादळी पावसाने गहू, हरभरा यासह संत्रा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यात यावर्षी पाण्याचा साठा लक्षात घेऊन अनेक शेतकर्यांनी हरभरा गहू, भाजीपाला, कांद्याची लागवड केली होती; मात्र १६ मार्चला झालेल्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले होते; परंतु लवकरच पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर आले.
तांदळी येथे उभा गहू जमीनदोस्त, कांदा बीजाचेही नुकसान
वाशिम आणि अकोल्याच्या सीमेवरील तथा वाशिम जिल्हय़ाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तांदळी या गावात आज दुपारी वादळी वार्यासह, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यासह कांदा बीजाचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.