पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:46+5:302021-06-25T04:28:46+5:30
तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने कहर केला होता. तेव्हा पेरणी करणेही कठीण झाले, एवढा पाऊस होता. त्यानंतर काही ...
तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने कहर केला होता. तेव्हा पेरणी करणेही कठीण झाले, एवढा पाऊस होता. त्यानंतर काही दिवसांत पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. सद्य:स्थितीत तालुक्यात जवळपास ८० टक्के पेरणी आटोपली आहे. आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके माना टाकू लागली असून. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. महागाईचा सामना करत शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाला असल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी केली. आधीच सोयाबीन बियाणे महागले, अशातच तुटवडा पडला होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. या वर्षी सोयाबीन बियाणे महागले होते तरीही कपाशीपेक्षा अधिक प्रमाणात पेरा झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्रात मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला होता. आता मात्र पावसाने दडी मारली असल्याने पूर्वीच्या पेरणीत उगवलेली पिके संकटात सापडली आहेतच, शिवाय राहिलेल्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. ऐन पेरणी झाल्यावर मान्सूनचा लहरीपणा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.