लोकसहभागातून आकार घेताहेत शेततळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:14+5:302021-06-19T04:27:14+5:30
पाणी फाउंडेशनकडून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या ...
पाणी फाउंडेशनकडून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनाच सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील मिळून ६१ गावांचा समावेश आहे. या गावांत स्पर्धेंतर्गत विविध कामेही केली जात आहेत. त्यात नाडेप, कंपोस्ट खत, वृक्ष लागवडीसह जलसंधारणाच्या विविध कामांचा समावेश आहे. पाणी फाउंडेशनची टीम आणि प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी ही कामे करीत आहेत. त्यात प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी लोकसहभागातून शेततळ्यांची कामे करीत आहेत. कारंजा तालुक्यातील विळेगाव, जानोरी, बांबर्डा, मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन, बोरव्हा पारव्हासह इतर काही गावांत ही जलसंधारणाची कामे वेगात होत आहेत.
-------
बॉक्स : जानोरीतील शेततळे वेधतेय लक्ष
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या कारंजा तालुक्यातील जानोरी गावात प्रशासनाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी भव्य शेततळ्याची निर्मिती केली आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने या शेततळ्याची निर्मिती करण्यात आली असून, शेततळ्यात पाणी जमा होण्यासाठी सोडलेल्या भागांत खडी आणि दगड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्यातील कचरा आणि गाळ बाहेरच अडणार आहे, हे शेततळे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-----