पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी १२ दिवसांपासून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:49 PM2018-11-21T17:49:26+5:302018-11-21T17:50:08+5:30
रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बुधवार २२ नोव्हेंबरला १२ व्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. प्रशासनाकडून अद्यापही या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही.
रिसोड तालुक्यातील बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष नाना चतुर यांच्या नेतृत्वात बौद्ध बांधवांनी गटविकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, ग्रामपंचायत नंधाना अंतर्गत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराची गाव नमुना ८ अ प्रमाणे ६० बाय ३० अशी ९० चौरस फुट जागा असून, सदर परिसरात बौद्ध बांधव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. सदर पुतळा व परिसराची देखरेख ही नंधानाचे सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात येते. असे असतानाही सदर परिसरात पुतळा परिसरातील बौद्ध मंडळाच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. सदर बांधकामामुळे धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात अडचणी येत आहेत. वारंवार मागणी करूनही संंबंधितांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी नाना चतुर यांच्यासह सहा लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे. या उपोषणाला १२ दिवस उलटले तरी, प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही.