शेतजमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी धरणाच्या बांधावर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:13+5:302021-04-02T04:43:13+5:30
फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत ...
फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत नाही, असे पत्र लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पत्र दिले; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संबंधित विभागाने कोरडवाहू दराने सरळ खरेदी करून येथील ३० शेतकऱ्यावर अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय्य मागणीसाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मागितला, वेळोवेळी मुंबई येथे मंत्रालयात धडक देऊन निवेदने दिली, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे राजेश बाबूराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून धरणाच्या बांधावर साखळी उपोषण सुरू केले आहे. राजेश राठोड यांनी सांगितले की, संबंधित यंत्रणा आम्हाला न्याय देत नाही. धर्मा पाटीलप्रमाणे जीवनयात्रा संपविल्यावर आमच्या प्रकरणाकडे माय-बाप सरकार लक्ष देईल का, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला असून, न्याय मिळेपर्यंत धरणाच्या बांधावर कोरोना संसर्गाचे नियम पाळून साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपोषणस्थळी शेतकरी दिलीप किलसिंग राठोड, बन्सी शंकर राठोड, सुधाकर हिरासिंग राठोड, रमेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.