चौकशीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार
By संतोष वानखडे | Published: November 1, 2023 07:30 PM2023-11-01T19:30:54+5:302023-11-01T19:31:38+5:30
उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रकृती खालावत असतानाही उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचारास नकार दिला.
वाशिम : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या एकलारा, गुंडी, वाटोद येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कामाची चौकशी व्हावी म्हणून येथील तीन नागरिकांनी पंचायत समिती समोर ३० आक्टोबरपासून पुकारलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही (दि.१) सुरू होते. दरम्यान, उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रकृती खालावत असतानाही उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचारास नकार दिला.
ग्रामपंचायतच्यावतीने सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये तीन लाखाचा सिमेंट रस्ता शासकीय अंदाज पत्रकानुसार करण्यात आला नाही. रस्त्यात वापरलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे आहे. गुंडी येथील तांडा सुधार योजनेतून दहा लाख रुपयेचा सिमेंट रस्ता लोकेशन नुसार टाकण्यात आले नाही व काम सुमार दर्जाचे आदी आरोप उपोषणकर्त्यांनी केले. या सर्व कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी संदीप संभाजी ढाकूळकर, प्रफूल पांडुरंग खडसे व किशोर बीबीषण राठोड यांनी ३० आक्टोबरपासून सुरू केलेले उपोषण १ नोव्हेंबर रोजीदेखील सुरूच होते.
मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक वाघमारे, ग्रामसेवक गजानन जाधव, पं.स. सदस्य गोपाल पाटील, गोविंदराव म्हातारमारे, बाजार समिती सभापती डॉ. संजय रोठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडविण्याची विनंती केली. ग्रामसेवक जाधव हे अहवाल ४ वाजेपर्यंत देतो असे म्हणाले. पण अहवाल न दिल्याने उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिले.
उपचार घेण्यास नकार
१ नोव्हेंबरला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रफुल खडसे यांना सौम्य ताप, खोकला व बीपी कमी झाल्याचे आढळून आले तर संदीप ढाकुलकर यांची साखरेची पातळी कमी झाल्याने उपोषणकर्ते यांना औषध घेण्याची विनंती केली. परंतू, त्यांनी ती नाकारली.