पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:50 PM2024-05-03T18:50:59+5:302024-05-03T18:52:37+5:30
मृतकांमध्ये शिक्षक आमदार सरनाईक यांचा पुतण्या, पुतणी व नातीचा समावेश
सुनील काकडे, वाशिम : मेडशीमार्गे अकोल्याकडे जात असताना पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिक दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत वाशिमचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर अरूणराव सरनाईक (२८), पुतणी शिवानी अजिंक्य आमले (३०) आणि नात अस्मिता अजिंक्य आमले (९ महिने) यांच्यासह सिद्धार्थ इंगळे (पास्टूल, पातूर), शंकर ठाकरे आणि सुमेध इंगळे हे सहा जण जागीच ठार झाले; तर अन्य चार जण गंभीर जखमी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रघुवीर याच्यासह कुटुंबातील अन्य मंडळी त्यांच्या एम.एच. ३७ व्ही ०५११ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अकोल्याकडे चालले होते. यादरम्यान पातूरच्या घाटातील नवीन बायपासनजिकच्या नानासाहेब मंदिराजवळ विरूद्ध दिशेने भरधाव वेगात आलेले चारचाकी वाहन सरनाईक कुटुंबियाच्या वाहनास धडकले.
हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर होऊन रघूवीर, शिवानी, अस्मिरा यांच्यासह सिद्धार्थ इंगळे, सुमेध इंगळे आणि शंकर ठाकरे हे सहा जण जागीच ठार झाले; तर सपना देशमुख (४१) आणि वैभव देशमुख (११), पियूष देशमुख (११) आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३ महिने) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या ह्रदयद्रावक घटनेची वार्ता वाशिममध्ये कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक आणि त्यांचे बंधू प्राचार्य अरूणराव सरनाईक यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास पातूर पोलिस करित असल्याची माहिती मिळाली.