मानोरा-मंगरुळपीर मार्गावर शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:43 PM2018-07-24T13:43:28+5:302018-07-24T13:45:05+5:30
जोगलदरी (जि. वाशिम): ग्रामीण भागांत उच्च शिक्षणाच्या असुविधेपोटी शहरी भागात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
चित्र: वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी (जि. वाशिम): ग्रामीण भागांत उच्च शिक्षणाच्या असुविधेपोटी शहरी भागात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनांत जनावरांसारखे कोंबून आणि मागच्या बाजूला वाहनाबाहेर लटकत उभे ठेवून विद्यार्थ्यांना प्रवास घडविला जात आहे. मंगरुळपीर-मानोरा मार्गावर रोजच हे थरारक आणि धोकादायक चित्र पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर-मानोरा मार्गावरील जोगलदरी, कोळंबी, दाभा, कोठारी, कवठळ, सावरगाव, चेहेल, धानोरा आदि गावांतील विद्यार्थी गावांत पुरेशा शिक्षण सुविधेअभावी मंगरुळपीर शहरातील शाळांत शिक्षण घेत आहेत. सकाळी ७ वाजतापासून हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी वाहनांची प्रतिक्षा करताना रस्त्यावर उभे असतात. त्यात ग्रामीण भागांत पुरेशा बसफेऱ्या नसल्याने त्यांना आॅटोरिक्षा, काळीपिवळी किंवा इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या वाहनांत आधीच प्रवासी बसले असताना विद्यार्थ्यांना शक्य तेवढे आत कोंबून बसविले जाते किंवा वाहनाच्या मागील भागांत लटकणाºया स्थितीत उभे ठेवले जाते. सकाळी ७ ते ८ दुपारी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मंगरुळपीर-मानोरा मार्गावर विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा शिक्षण प्रवास रोज पाहायला मिळतो. या गंभीर प्रकारामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता असतानाही वाहतूक पोलिसांकडून याची दखल घेतली जात नाही.
प्रवासी क्षमतेच्या नियमांचे उल्लंघन
परिवहन विभागाच्यावतीने विविध प्रवासी वाहनांची प्रवासी क्षमता किंवा संख्या निर्धारित करण्यात आली आहे. जीप किंवा काळीपिवळीसारख्या वाहनांत ८ अधिक १, लहा आॅटोरिक्षात ३ अधिक १, तसेच इतर वाहनांसाठी आकारमानानुसार प्रवासी संख्येची क्षमता निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मूभा असली तरी, या नियमांचे बंधन पाळणे आवश्यक आहे; परंतु वाहतुकीचे हे नियम धाब्यावर बसवून खाजगी वाहनधारक प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यात काही वाहने, तर केवळ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठीच वापरण्यात येत असली तरी, एका वाहनांत २० पेक्षा अधिक विद्यार्थी कोंबले जात आहेत.