घरगुती वादातून बापाने केला मुलीवर चाकूहल्ला; कामरगावची घटना
By सुनील काकडे | Updated: November 25, 2023 17:35 IST2023-11-25T17:35:11+5:302023-11-25T17:35:57+5:30
मुलगी गंभीर जखमी.

घरगुती वादातून बापाने केला मुलीवर चाकूहल्ला; कामरगावची घटना
सुनील काकडे, वाशिम : घरगुती वादातून बापाने स्वत:च्या मुलीवर चाकूहल्ला केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धनज पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथील लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडली. सजना गोपाल जाधव (हिवरा, ता.मानोरा) असे चाकूहल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी धनज पोलिसांनी आरोपी गोपाल जाधव यास घटनास्थळावरच अटक केली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी सजना गोपाल जाधव ही कामरगाव येथील लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात पिंप्री मोडक येथे जाण्यासाठी उभी होती. तिचे वडिल गोपाल नामदेव जाधव यांनी त्याठिकाणी येवून अचानक तिच्यावर चाकू हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तशा अवस्थेत तिला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हल्ला करणारा गोपाल जाधव यास ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे बापाने स्वत:च्या मुलीवर चाकूहल्ला का केला, यामागील नेमके कारण कळू शकले नाही.
अचानक घडला थरार; कामरगाववासी आवाक्
मानोरा तालुक्यातील हिवरा लाहे येथील मुलगी पिंप्री मोडक येथे जाण्यासाठी कामरगावच्या ऑटो पॉईंट चौकात उभी होती. त्याठिकाणी येवून तिच्याच बापाने अचानक तिच्यावर चाकूहल्ला चढविला. यामुळे क्षणात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. अचानक घडलेला हा थरार पाहून कामरगाववासी आवाक् झाले.