Father's Day Special : रक्ताचे नाते नसलेल्या १५ अंधांचे पितृत्व स्वीकारणारा ‘पांडुरंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:21 PM2021-06-20T12:21:42+5:302021-06-20T12:22:07+5:30
Father's Day Special: केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १५ मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत.
- नंदकिशाेर नारे
वाशिम : तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणारे, स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १५ मुलांचे, त्यातही ते अंध मुलांचे जन्म न देता वडील झाले आहेत. त्यांच्या पालन- पोषणसह शिक्षणाची जबाबादारी ते आवर्जून पार पाडत आहेत.
पांडुरंग हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्या सोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना, आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले. पाहता- पाहता त्यांच्या झोपडीत १५ मुले जमा झालीत. सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंग यांचे ते आधार झाले आहेत. या सर्वांनी आर्केस्टा काढला. लग्न समारंभ, सामाजिक उपक्रमांत शासकीय योजनांचा ते प्रचार- प्रसार करीत आहेत. रक्षाबंधनानिमित्त सर्व अंध मुले राख्या तयार करून विकताहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले; परंतु अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने तीही वेळ निघून गेली. अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत.
१५ अंधांचे पितृत्व स्वीकारणारा ‘बाप माणूस’
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी व्यतीत करणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!
पालकत्व स्वीकारलेली मुले
दशरथ जोगदंड, कैलास पानबुडे, भरत खांडेकर, विजय खडसे, विकास गाडेकर, अश्विनी पवार, राधिका गाडेकर, अमोल गोडघासे, लक्ष्मी पानबुडे, गजानन खडसे, रूपेश हिरोळकर, मंगेश पुणेकर, रूपाली फुलसावंगे आदींचा समावेश आहे.
‘पेरलं ते उगवतं’, अशी एक मराठीत म्हण आहे, तसेच माझ्या काही बाबतीत घडले. माझ्या मुलापासून प्रेरणा मिळाल्याने ज्यांना कोणी सहारा देत नाही, अशा अंध विद्यार्थी, बालक, युवकांना मी सांभाळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कठीण प्रसंगातून न खचता व्यवस्था केली. आज तेच सर्व मला कुटुुंब चालविण्यास मदत करत आहेत. जिल्ह्यातच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रात या बालकांमुळे माझी ओळख झाली आहे. अनेक जण मला ‘अंधांचा वाली पांडुरंग’ म्हणूनही संबाेधतात.
-पांडुरंग उचितकर, केकतउमरा, ता. जि. वाशिम