बस नादुरूस्त; प्रवाशांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:55 PM2019-09-20T16:55:02+5:302019-09-20T16:55:20+5:30
अकोला ते परभणी ही बस नादुरुस्त अवस्थेतच २० सप्टेंबरला परभणीकडे गेल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अकोला ते परभणी बस : महामंडळाने लक्ष देणे गरजेचे
शिरपूर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बस नादुरुस्त अवस्थेतच २० सप्टेंबरला परभणीकडे गेल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बसच्या पाठीमागील बाजूचा ‘सेंटर बोल्ड’ तुटलेला अवस्थेत असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता अकोला आगाराच्या बस स्थानक क्रमांक दोन मधून एमएच ४० वाय ५८९१ क्रमांकाची अकोला ते परभणी ही बसफेरी अकोला येथून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. सदर बसच्या चालकाच्या बाजूचा पाठीमागील सेंटर बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहे. तरीदेखील बस अकोला ते परभणी सोडण्यात आली. हि बस रस्त्याने मोठ्या प्रमाणात मागील बाजू झुकलेल्या अवस्थेत जात होती. धोकादायक अवस्थेत बसचा प्रवास मालेगाव ते शिरपूर पर्यंत झाला. शिरपुर बस स्थानकावर सजग नागरिकांनी बस चालकाला सदर बस पुढील प्रवासासाठी नेणे धोकादायक असल्याचे सांगून सदर बस पुढे नेऊ नये अशी विनंती केली. मात्र दुरुस्तीसाठी मेकॅनिकल शिरपूरला येणार नाही म्हणून चालकाने रिसोडपर्यंत बस नेली. रिसोड आगारात बस दुरुस्त करून घेत असल्याचे चालकाने सांगितले. सध्या मालेगाव ते रिसोड रस्त्याचे काम चालू असल्याने बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नादुरूरूस्त बस चालविणे धोकादायक ठरू शकते.