‘लॉकडाऊन’ काळात भागविली मोकाट श्वानांची भूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:45 AM2020-05-10T10:45:03+5:302020-05-10T10:45:41+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या ४५ दिवसांपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. या काळात रस्त्यांवरील नाश्ता विक्रीच्या हातगाड्या, हॉटेल्स, रेस्टॉरंटही बंद असल्याने उष्टावळीवर जगणाऱ्या मोकाट श्वानांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर २५ मार्चपासून संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावण्यात आलेला आहे. तिसºया टप्प्यात ‘लॉकडाऊन’ १७ मे पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच ठिकाणचे कामधंदे ठप्प पडल्याने हातावर पोट असणाºया गोरगरिबांच्या कुटूंबात दोनवेळच्या जेवणाचे वांधे झाले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत वाशिममध्ये राजाभैया मित्रमंडळाच्या सदस्यांनी सामाजिक संवेदना जपत अन्नदानाचे कार्य हाती घेतले. भुकेल्या गोरगरिबांसोबतच रस्त्यावर फिरणाºया मोकाट श्वानांचेही पोट भरण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानुसार, रोज रात्रीच्या सुमारास वाशिम शहरातीलर स्त्यांवर फिरून राजाभैया पवार, सुशील भिमजीयाणी, महादेव हरकळ, विक्रम बबेरवाल ही मंडळी ब्रेड, भात, बिस्कीट, पोळी याव्दारे श्वानांची भूक शमविण्याचा प्रयत्न करित आहेत. विशेषत: या सामाजिक कार्यात काही पोलिस अधिकाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला आहे.
‘ग्रीन झोन’मध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्याला ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता मिळाली असून दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली; मात्र हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासंबंधी अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे रस्त्यांवर फिरणाºया मोकाट गायी, श्वानांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अशा स्थितीत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रोज रात्रीच्या सुमारास मोकाट जनावरांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.