पाण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक; व्यक्त केला रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:12 PM2019-05-15T18:12:54+5:302019-05-15T18:14:49+5:30
संतापलेल्या महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अन्य गावांप्रमाणेच देवठाणा खांब येथेही यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणी पुरविण्याची मागणी असताना प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर संतापलेल्या महिलांनी बुधवार, १५ मे रोजी चक्क भांड्यांची आदळआपट करून प्रशासकीय धोरणांविरूद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.
घनदाट जंगलाने वेढलेल्या देवठाणा खांब या गावात दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे शासकीय टँकरने पाणीपुरवठा करावा लागला नाही, असे एकही वर्ष आतापर्यंत गेले नाही. उन्हाळ्याच्या दिवसात मानसांनाच प्यायला पाणी मिळत नाही, तिथे गुराढोरांचा काय टिकाव लागणार. यामुळे जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातच गावातील पुरूष मंडळी आपापली दुधाळ जनावरे पाण्याची सोय असलेल्या इतर गावांमधील नातेवाईकांकडे सोडून येतात. तशीच विदारक स्थिती यंदाही उद्भवली आहे. गावाच्या चारही बाजूला घनदाट जंगल असून वन्यप्राण्यांचा सदोदित वावर असतो; मात्र अशाही बिकट स्थितीत डोईवर हंडा घेवून गावातील महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १६ गावांमध्ये आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; परंतु देवठाणा खांब येथे मागणी होवूनही अद्यापपर्यंत टँकर पोहचलेले नाही. यामुळे विशेषत: महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टँकरच्या पाण्यासाठी तांड्यातील महिलांनी बुधवारी रस्त्यावर उतरून भांड्यांची आदळआपट करित आपला रोष व्यक्त केला.
या आंदोलनात कांताबाई नारायण चव्हाण, शांताबाई फुलसिंग राठोड, गीता मोहन राठोड, बेबीबाई मांगीलाल जाधव, प्रयागबाई वामन तिवाले, मंदा नारायण हांडे, यमुना सिताराम राठोड, सुवर्णमाला गिरधर चव्हाण, वनिता सुखदेव राठोड, इंदू गोविंदा राठोड, सुशीला बबन राठोड, शितल दिनकर राठोड, सुमन आकाराम चव्हाण, अनुसया चव्हाण यांच्यासह इतर महिलांनी सहभाग घेतला.