महिला शिक्षिका पोहोचल्या विद्यार्थ्यांच्या दारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 10:11 AM2021-01-03T10:11:11+5:302021-01-03T10:11:19+5:30
Washim News सात-आठ विद्यार्थ्यांचे गट पाडून मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे.
वाशिम : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून महिला शिक्षिकादेखील सरसावल्या असून, समुदाय पद्धतीने गावातील मोकळ्या जागेत, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणी समुदाय पद्धतीने शिकविण्यात येत आहे.
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे २३ मार्चपासून शाळा बंद आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७६ प्राथमिक शाळा असून, जवळपास ६३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल, संगणक, टॅब आदी साहित्य उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी ग्रामपंचायत सभागृह, मंदिर, मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात शिक्षिकादेखील समुदाय पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवित असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात प्राथमिक शाळेवर जवळपास ३१३१ शिक्षक कार्यरत आहेत, यामध्ये ७७८ महिला शिक्षिकांचा समावेश आहे. सात-आठ विद्यार्थ्यांचे गट पाडून मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळत आहे. विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला शिक्षिकांचे काैतूक हाेत आहे.