जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतक-यांचे अर्धनग्न उपोषण
By admin | Published: May 4, 2017 07:33 PM2017-05-04T19:33:07+5:302017-05-04T19:33:07+5:30
जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी १ मे पासूनशेतकºयांनी पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
मेहकर (बुलडाणा): तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्यांच्या पेनटाकळी प्रकल्पात गेलेल्या
जमिनीचा मागील १५ वर्षापासून मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर
उपासमारीची पाळी आली आहे. जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी १ मे पासून
शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. मात्र
प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे ४ मे रोजी संतप्त झालेल्या
उपोषणकर्त्यांनी अर्धनग्न उपोषण सुरु केले आहे. या उपरही २ दिवसात न्याय
न मिळाल्यास जलत्याग करण्याचा निर्णय उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
उटी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन पेनटाकळीच्या कामासाठी शासनाने संपादीत
केलेली आहे. संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक
असतांनाही गेल्या १५ वर्षापासून हा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी २५ एप्रिल २०१६ दरम्यान उपोषण
केले होते. त्यावेळी पेनटाकळीच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट
देऊन संपादीत केलेल्या जमिनीचे दर १५ मे २०१६ पासून मंजूर करुन १० जून
२०१६ पासून संपादीत केलेल्या जमिनीची खरेदी प्रक्रिया करण्याचे लेखी
आश्वासन दिले होते. परंतु याला जवळपास १ वर्षाचा कालावधी होऊनही
अद्यापपर्यंत जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तर जमीन खरेदीची प्रक्रिया
सुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली
आहे. जमिनी पेनटाकळी प्रकल्पात गेल्याने उपजिवीकेचे दुसरे कोणतेच साधन
नाही. तसेच शासनाकडूनही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्रस्त
झालेल्या पांडूरंग नामदेव चांदणे, गुलाबराव साहेबराव दाभाडे, शेषराव
मोतीराम धोटे, शेख नुर शेख चाँद, गजानन कुंडलीक दाभाडे, भगवान किसन
नाटेकर, ज्ञानदेव नरहरी काळे, गोविंद दासु राठोड, शेख मुसा शेख अहमद या
शेतकऱ्यांनी १ मे पासून प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)