खत, बियाण्यांची दरवाढ; लागवड खर्च वाढणार!
By admin | Published: June 14, 2016 02:11 AM2016-06-14T02:11:51+5:302016-06-14T02:11:51+5:30
शेत मशागतीची कामे पूर्ण : खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज.
सुनील काकडे / वाशिम
गेल्या तीन वर्षांंपासून सततचा दुष्काळ सहन करीत असणार्या शेतकर्यांना किमान यंदा तरी दमदार पाऊस होऊन जोमदार उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतमशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकरी खरिपातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे खत, बी-बियाणे यासह रासायनिक औषधीचे दर वाढल्याने यंदा लागवड खर्चातदेखील वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाशिम जिल्ह्यात नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणार्या सोयाबीनला शेतकर्यांची प्रथम पसंती आहे. सोयाबीनचे कोठार म्हणून ओळख मिळविलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातही सोयाबीनचाच विक्रमी पेरा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षाचा पाऊस, पीकपेरा आणि हाती आलेल्या प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार केल्यास निसर्गाचा लहरीपणा, पावसातील अनियमितता आदी कारणांमुळे शेतकर्यांच्या पदरी केवळ निराशाच पडल्याचे दिसून येते. खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बी हंगामातही खासगी तथा बँकांकडून कर्ज उचलणार्या शेतकर्यांना किमान लागवड खर्चाइतकेही उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. असे असताना झाले गेले विसरून शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने २0१६ च्या खरीप हंगामाला सामोरे जात आहे. मात्र, यंदाही मृग नक्षत्र सुरू होऊन ५ दिवस उलटल्यानंतरही मोठय़ा पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही. दुसरीकडे शेत मशागतीपासून बी-बियाणे, खत, रासायनिक औषधीचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत. सध्या शेतकर्यांना प्रती ३0 किलोच्या सोयाबीन बियाणे बॅगसाठी २४00 रुपये मोजावे लागत आहेत; तर खताची एक बॅग किमान हजार रुपयाला मिळत आहे. याशिवाय काडीकचरा वेचणे, नांगरण, वखरण आदी शेतमशागतीच्या कामांसाठी एकरी सुमारे ५ ते ६ हजार रुपये खर्च लागलेला आहे. तथापि, पावसाने किमान यंदातरी अपेक्षित साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.