भंगारातील साहित्य घेऊन बनविले खत पेरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:29 PM2019-08-25T13:29:58+5:302019-08-25T13:30:20+5:30
मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे.
- नरेश आसावा
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. विशेष म्हणजे यासाठी सदर शेतकऱ्याने भंगारातील टाकाऊ साहित्याचाच वापर केला आहे.
इंझोरी येथील युवा शेतकरी अजय ढोक हे आपल्या वडिलोपार्जित शेतीत विविध पिके घेऊन आर्थिक विकास साधण्याची धडपड करीत आहेत. त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोगही केले आहेत. कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतीतील अधिकाधिक कामे कशी करता येतील, यासाठी ते सतत वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातील काही प्रयोग यशस्वीही झाले आहेत. याच प्रयोगातून त्यांनी कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रभावीरित्या खताची पेरणी करावी म्हणून चक्क ट्रॅक्टरचलित खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. यासाठी त्यांनी एक लोखंडी पेटी, दुंड्याची फ्रेम, मोठ्या पेरणी यंत्राचा गिअर आणि चेन व्हील सेट, असे विविध साहित्य भंगाराच्या दुकानातून खरेदी केले. हे सर्व साहित्य जोडून त्यांनी अवघ्या पाच हजार रुपयांत अतिशय उपयुक्त असे खत पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना लक्ष्मणराव आखुळ यांचे सहकार्य लाभले. खत पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या शेतात केले आणि ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या पेरणी यंत्राच्या आधारे कपाशी, तूर, मुग, उडिद, सोयाबीन, पपई, कारले, दोडका आदि विविध पिकांत खत पेरणीही त्यांनी यशस्वीपणे करून दाखविली. इंझोरी येथील शेतकरी अजय ढोक यांनी वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चात भरघोस पिक घेण्याची कामगिरीही साधली आहे. कपाशी, तूर, सोयाबीन, मुंग, उडिद या खरीप पिकांसह भाजीपाला पिकांचेही ते अधूनमधून उत्पादन घेतात. यापुढे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तणाचा समुळ नायनाट करणे, फवारणीचे काम सोपे करण्यासाठीही यंत्र विकसीत करता येईल का, याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
इतरही शेतकºयांकडून वापर
इंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी खत पेरणीसाठी तयार केलेले यंत्र स्वत:च्या शेतात खतपेरणीसाठी वापरले असून, याचा फायदा होत असल्याने इतरही शेतकरी त्यांच्याकडून या यंत्राचा वापर करीत आहेत. गावातील अनेक शेतकºयांनी या यंत्राच्या आधारे शेतातील आंतर पिकात खत टाकून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचलाच आहे शिवाय मजुरांच्या तुटवड्याचा त्रासही टळला असून, पिके योग्य प्रमाणात मिळालेल्या खतामुळे जोमदार झाली आहेत. प्रामुख्याने कपाशीच्या पिकात याचा वापर होत आहे.
एकरी सहाशे रुपयांसह वेळेची बचत
या यंत्रामुळे शेतकºयांना पिकांना खत देण्यासाठी येणाºया खर्चात एकरी ६०० रुपयांची बचत होतेच शिवाय कमी वेळेत प्रभावी पद्धतीने खत पिकांना देणे शक्य होत असल्याने पिकांना त्याचा मोठा फायदा होऊन पिके जोमदारही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याशिवाय आंतरमशागतीच्या खर्चातही ६०० रुपयांची बचत या यंत्रामुळे होत आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकºयांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.