संसर्ग टाळण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’; २० हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:15 AM2020-07-06T11:15:21+5:302020-07-06T11:15:42+5:30
सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाने ‘फिव्हर क्लिनिक’ची सुविधा उपलब्ध केली असून, या क्लिनिकमध्ये ४ जुलैपर्यंत जवळपास २० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.
संसर्गजन्य आजाराला वेळीच आवर घालणे, नागरिकांपर्यंत इत्यंभूत माहिती पोहचवून कोणती दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ६ जुलै रोजी जागतिक संसर्ग निवारण दिन साजरा करण्यात येतो. संसर्गजन्य आजारात एकूण तीन प्रकारचे आजार असून, यामध्ये किटकजन्य, हवेद्वारे पसरणारे आणि पाण्याद्वारे पसरणारे आजाराचा समावेश आहे. किटकजन्य आजारात तीव्र मेंदुज्वर, हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यू आदींचा समावेश आहे. हवेद्वारे पसरणाºया आजारात स्वाईन फ्लू, क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर आदीचा समावेश आहे. दूषित पाण्याद्वारे तीव्र अतिसार व तत्सम आजार, कॉलरा, काविळ अ आणि ए
पोलिओ आदी आजार उद्भवतात. वाशिम जिल्ह्याचा विचार करता, हिवताप, डेंग्यू, क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, गोवर, अतिसार, काविट अ आणि ए आदी संसर्गजन्य आजार उद्भवतात. गतवर्षी स्वाईन फ्ल्यूचे सहा ते सात रुग्ण आढळले होते. चालू वर्षात तर कोरोना विषाणू संसर्गामुळे अन्य संसर्गजन्य आजारी रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. क्षयरोगाचे सध्या ५८६ रुग्ण असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहे. क्षयरुग्ण तपासणीसाठी अत्याधुनिक मशिन्स् जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याने संसर्ग टाळण्याच्या दृष्टिने ती मोठी उपलब्धी आहे.
दरम्यान, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विशेष खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर फिव्हर क्लिनिकची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोनापूर्वीची लक्षणे ही सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारातील असल्याने या क्लिनिकमध्ये केवळ सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाºया जवळपास २० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांना वेळीच उपचार मिळाले. दुसरीकडे परगावावरून परतलेल्या ७० हजार नागरिकांमुळे कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांमध्ये ३ जुलैपर्यंत केली आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, नागरिकांनीदेखील स्वत: सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी केले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जात आहे. बाहेरगावावरून परतणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले.
- ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम