शाळांमध्ये संगणकीय शिक्षणाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:49 PM2019-03-18T16:49:59+5:302019-03-18T16:50:06+5:30
शिक्षकांना पुनर्नियुक्ती अथवा विषय शिकवायला नवे संगणक शिक्षक न मिळाल्याने संगणकीय शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
वाशिम : शासनस्तरावरून सन २००८ पासून राबविण्यात येत असलेल्या आयसीटी (इन्फॉर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) अंतर्गत शाळांना संगणक पुरविण्यात आले. मात्र, त्यासंबंधीचे शिक्षण देणाऱ्या मानधन तत्वावरील ८ हजार शिक्षकांची सेवा डिसेंबर २०१९ मध्ये संबंधित त्या-त्या कंपन्यांनी संपुष्टात आणली. तेव्हापासून शिक्षकांना पुनर्नियुक्ती अथवा विषय शिकवायला नवे संगणक शिक्षक न मिळाल्याने संगणकीय शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देण्यासाठी शासनाने २००८ मध्ये ‘आयसीटी’ योजना अंमलात आणली. त्यासाठी संबंधित शाळांवर मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबर २०१९ पासून सर्व संगणक शिक्षकांची सेवा संपुष्टात आणल्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरातील शाळांमध्ये असलेले संगणक धूळ खात विनावापर पडून आहेत.
केंद्र व राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील शाळांना संगणक संच पुरविण्यात आले. त्याची जबाबदारी त्या-त्या कंपन्यांकडे सोपविण्यात आलेली होती. त्यांनीच संगणक शिक्षकांचीही मानधन तत्वावर नेमणूक केली. सेवा संपुष्टात आल्यानंतर कंपन्यांनी शिक्षकांना पुनर्नियुक्ती द्यायला हवी होती.
- टी.एन. नरळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम