वाशिम जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये आरोग्यविषयक सुविधांचा बट्टयाबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 02:50 PM2019-06-02T14:50:17+5:302019-06-02T14:50:39+5:30
आरोग्यविषयक सुविधांचा पूर्णत: बट्टयाबोळ उडाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबातील नागरिकांना खासगी दवाखान्यांचा खर्च परवडत नाही.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील रुग्णांना पुरेशा तथा दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रांचा दर्जा दिला; मात्र बहुतांश ठिकाणी आरोग्यविषयक सुविधांचा पूर्णत: बट्टयाबोळ उडाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबातील नागरिकांना खासगी दवाखान्यांचा खर्च परवडत नाही. ही बाब लक्षात घेवून आयुष्यमान भारत योजनेंतर्गत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये करून विविध स्वरूपातील १२ प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचा निर्धार शासनाने केला. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यात २५ पैकी २२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू देखील झाले आहेत. याठिकाणी ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ म्हणून १०८ बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक देखील करण्यात आली. दरम्यान, संबंधित केंद्रांमध्ये शासनस्तरावरून ठरल्यानुसार गर्भवती महिलांची प्रसुती, नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी, लसीकरण, कुटुंब नियंत्रणांतर्गत पुरेशा सुविधा, संसर्गजन्य आजारासाठी बाह्यरुग्ण विभाग, मानसिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यासंदर्भातील समस्यांवर प्रभावी उपचार, ट्रॉमा सर्व्हिस व तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे क्रमप्राप्त आहे. याशिवाय योगासनांचे धडे देखील या केंद्रांमध्ये मिळायला हवे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये नमूद सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची आजही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
शेलुबाजार येथे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले; परंतु कुठल्याच विशेष सुविधा नाहीत. रुग्णवाहिका नेहमीच नादुरूस्त असते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची केवळ रंगरंगोटी करून त्यास आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव देण्यापुरते मर्यादित न राहता गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.
- अर्चना मोहन राऊत, सरपंच, शेलुबाजार ग्रामपंचायत
जिल्ह्यात आजमितीस २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रांचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याठिकाणी ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ म्हणून बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असून १२ प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा सर्वंकष प्रयत्न केला जात आहे. योगासनांचे धडे देण्यासाठी योगा शिक्षकांची नेमणूक करायची आहे; परंतु त्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., वाशिम