ग्रामीण भागात रुग्णसेवेचा बट्टयाबोळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:15 PM2019-11-18T15:15:14+5:302019-11-18T15:15:19+5:30
मुलभूत सुविधांचा अभाव यासह अन्य स्वरूपातील असुविधांमुळे रुग्णसेवेचा पुरता बट्टयाबोळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ७८९ गावे असून त्यातुलनेत ग्रामीण भागात केवळ २५ आरोग्य केंद्र आणि १५३ उपकेंद्र कार्यान्वित आहेत; शिवाय बहुतांश केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा वाढत चाललेला अनुशेष, मुलभूत सुविधांचा अभाव यासह अन्य स्वरूपातील असुविधांमुळे रुग्णसेवेचा पुरता बट्टयाबोळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील मेडशी (ता.मालेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील ३४ गावांसह ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याच्या देखभालीची जबाबदारी आहे. या केंद्रात वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), सहायक वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) अशा दोन अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत; मात्र गत अनेक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी (गट अ) कार्यरत नाहीत. तसेच सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक शेंडे हे गत सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले, तेव्हापासून आरोग्य सेवेचा कारभार समुदाय आरोग्य अधिकाºयांच्या खांद्यावर सोपविण्यात आलेला आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम-अकोला महामार्गावर वसलेले असून अपघातग्रस्त रुग्ण व प्रसुतीसाठी येणाºया महिलांची संख्या अधिक आहे; मात्र रुग्णांना अपेक्षित सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. सकाळ व सायंकाळच्या सुमारास ठरवून दिलेल्या वेळेत दवाखाना उघडला जात नाही. उघडलाच तर अधिकारी व कर्मचारी हजर नसतात, अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्याशी संलग्नित उपकेंद्रांमधील अधिकारी व कर्मचाºयांनी मुख्यालयी हजर ठेवून सुरळीत कामकाज करून घेण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याकडे आहे; मात्र ते मालेगाव या मुख्यालयी न राहता वाशिम येथून अप-डाऊन करित असल्याची माहिती प्राप्त झाली. एकूणच या सर्व समस्यांमुळे मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवेचा दैनंदिन फज्जा उडत आहे. मेडशीप्रमाणेच जिल्ह्यातील इतरही बहुतांश ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये अशाच स्वरूपातील समस्या उद्भवल्या असून त्या निकाली काढण्यात आरोग्य विभागाला अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निश्चितपणे वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. तालुक्यातील किन्हीराजा येथेही असाच प्रश्न उपस्थित झाला असून येत्या काही दिवसांत उद्भवलेल्या या समस्या निकाली काढल्या जातील. रुग्णांनी संयम ठेवावा.
- डॉ. संतोष बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव
मेडशीच नव्हे; तर जिल्ह्यातील इतरही ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम जाणवत आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी बी.ए.एम.एस. डॉक्टरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ते प्राप्त झाले असून लवकरच समस्या निकाली निघेल.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम